ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम – कविता महाजन

IMG_20180302_131721

ब्र आणि भिन्न ह्या अतिशय उत्तम आणि लोकप्रिय कादंबरी लिहिण्याऱ्या लेखिकेची अजून एक कादंबरी म्हणून मला ह्या पुस्तकाबद्दल खूप उत्सुकता होती. पण आश्चर्य म्हणजे मला ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू कुठेही नजरेस पडला नाही, त्यामुळे कदाचित मी हे पुस्तक वाचताना माझ्या मनाची अपेक्षा पाटी अगदी कोरी होती.

पुस्तकाचं कथासूत्र थोडक्यात सांगायचं तर ही कहाणी आहे पदमजा सप्रे हया अभिनेत्रीची; जी मराठी नाट्यसृष्टी ते हिंदी चित्रपट असा अभिनयाचा प्रवास करते आणि त्याबरोबरच एक उन्मुक्त, स्वच्छन्दि वैयक्तिक आयुष्य जगते. ज्यांना मराठी साहित्य, नाटक आणि हिंदी चित्रपट ह्यांची थोडीबहुत माहिती आहे, त्यांना इथे बरीच खऱ्या जगातील साम्यस्थळे सापडू शकतील.

हे कथानक सरळसोट असा प्रवास न करता, फ्लॅशबॅक / आठवणी/ आत्मचरित्र अशा वळणाने जाते. त्यामध्ये काही अपरिहार्य पुनरोक्ती आहेत, जी कधी कथा पुढे न्यायला मदत करतात किंवा वेगळया दृष्टीने तेच कथानक मांडतात. वाचक ठकी आणि तिच्या कथेत पुरता गुंततो, आपल्याला वाटतं की चला आला आता कथेचा शेवट; पण तिथेच येऊन कथा अशी अकल्पित वळण घेते की आपण क्षणभर थबकतोच.
मला हे धक्कातंत्र आवडलं, अगदी सामान्य वाटणारी ही कादंबरी मग एका वेगळ्याच प्रतलात जाऊन पोहोचते. वरवर एका अभिनेत्री आणि तिच्या भवतालाची ही कथा मग आगळावेगळा आयाम दाखवते; हे खरंखुरं वास्तव आहे हे स्वीकारायला आपल्याला एक वाचक असूनही घटकाभर वेळ लागतो. माझ्यामते हेच ह्या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे की कुठलाही गाजावाजा न करता एक अतिशय महत्त्वाचा विषय मांडते.
ज्यांना व्यक्ती आणि त्यांच्या मनोव्यापाराबद्दल वाचायला आवडेल त्यांच्यासाठी मी ह्या कादंबरीची शिफारस करेन.