माणसाला नेमकं काय हवं असतं?
हि कादंबरी सुरू होते तामिळनाडूमधील एका गावात एका तामिळ ख्रिश्चन कुटुंबामध्ये आणि आपली ओळख होते वरदा राजनायकशी. कुठल्याही सर्वसामान्य मध्यमवगीय कुटुंबसारखच राजनायक कुटुंबीय; वडिलांचा सचोटीचा स्वभाव, त्यामुळे त्यांना मिळणारा आदर आणि होणाऱ्या बदल्या, आईने एका निर्णायक क्षणापर्यंत कुटुंबावर ठेवलेली पकड, दोन्ही मोठ्या बहिणी आणि ह्या सुरक्षित जगात वयात येणारा वरदा. त्याच्या मोठे होण्याबरोबर सुरु होतो त्याचा स्वतःच्या शरीराचा शोध आणि त्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी एका स्त्रीशरीराचा शोध.
एका टप्प्यावर वरदाला जाणवलेली मानसिक गुंतवणुकीची गरज आणि त्यातून त्याचं झालेलं लग्न हा त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरतो. जसजशी ही कहाणी पुढे सरकते तसतशी वरदाची मानसिक आणि शारीरिक गरजेच्या मध्ये ससेहोलपट होताना जाणवते. ह्यामध्ये त्याच्या नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने झालेली परवड ही गोष्ट अधिकच गडद करते.
वरदा आता आयुष्यात स्थिरावणार असं वाटत असतानाच डाव उधळला जातो आणि वरदा नियतीच्या एका गरगरण्यारा आवर्तात खेचला जातो.