माध्यमक्रांती आणि त्याचे परिणाम आपल्या सर्वांना आता परिचयाचे झाले आहेत आता मीडिया केवळ वर्तमानपत्रांपर्यंच मर्यादित न राहता, अन्य उपकरणांद्वारे आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. सततच्या खऱ्या-खोट्या ब्रेकिंग न्यूजच्या माऱ्याने सामान्य माणसाला खरचं गांगरून जायला होत आहे, दर्जापेक्षा चमचमीत बातम्यांना महत्व आल्याने आपल्याला जी प्रस्तुत करतात ती खरंच पूर्ण सत्य बातमी असते का?
ह्या पडद्यामागच्या बातमीचा उहापोह करण्याचा एक क्षीण का होईना ही कांदबरी प्रयत्न करते आणि केवळ ह्या एकाच गोष्टीमुळे मी कादंबरी शेवटपर्यंत वाचू शकले.
कादंबरीचा फोकस आहे तो चॅनेल फोर नामक मिडिया कंपनीवर आणि पर्यायाने त्यातील किंवा त्याचाशी कनेक्टेड व्यक्तींवर – ह्यामध्ये सलील देसाई हा नायक आहे आणि कथा त्याच्या भोवती फिरते. सुरवातीला मिडिया कंपनी आणि त्यातील माणसे इंटरेस्टिंग वाटली तरीही लेखकाने त्यांचं व्यक्तिचित्रण खूपच एकांगी केल्याने ते तकलादू वाटू लागतं. किंबहुना रावी सोडल्यास अन्य कुठल्याच पात्राची छाप पडत नाही, अगदी नंतर येणाऱ्या कावेरीची देखील. समीर हा कादंबरीचा रूढार्थाने नायक असून देखील व्यवस्थित एस्टॅब्लिश होत नाही. त्याला भूतकाळ आहे आणि वर्तमानकाळात त्याचे पडसाद उमटतात, कधीतरी त्याची हि बाजू डोकावते; पण त्याला नायकाचे सर्वसमावेशक गुणधर्म चिकटवल्याने गोंधळ उडतो.
ज्यांना सध्याच्या राजकीय घडामोडी माहीत आहेत, त्यांना ह्या कथेमध्ये कुठेही फारसं नावीन्य आढळणार नाही. घटनांसारखी पात्र देखील खऱ्या व्यक्तिमत्वावर आधारित वाटण्याच्या शक्यता आहेत. मात्र सगळ्या नाट्यमय राजकीय हालचाली, खेळी आणि सनसनाटी बातम्या एकाच कथेमध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केल्यामुळे कादंबरी पसरट होत जाते; परंतु कुठलीच घटना आपला ठसा उमटवू शकत नाही. प्रूफ रिडींगमधील चुका जसं एकाद्या माणसाचं नाव पानागणिक बदलणं, हे देखील आपल्या रसास्वादात मोडता घालतात.
नवीन काळाची, नव माध्यमाची गोष्ट सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून हि कादंबरी एकदा वाचायला काहीच हरकत नाही.