एन्कीच्या राज्यात आणि काळेकरडे स्ट्रोक्स

विलास सारंग आणि त्यांची लेखनशैली ह्याबद्दल मी एकूण होते; पण कधीही वाचण्याचा योग आला नव्हता. त्यामुळे एन्कीच्या राज्यात हे त्यांचं मी वाचलेलं पहिलचं पुस्तक, पण अनोळखी लेखक असल्याचं अजिबात जाणीव करून देत नाही.

पुस्तकाचा नायक हा एक प्रोफेसर आहे, अमेरिकेत राहून आपली डिग्री पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. पण ती पूर्ण झाल्यावर तो नोकरीच्या निमित्ताने इराकमध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतो. ही एकच गोष्ट त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते.

इतर भारतीय लोकांसारखं शिक्षण पूर्ण करून एखादी बऱ्यापैकी नोकरी करून टिपिकल अमेरिकन सुखवस्तू आयुष्य जगण्याचा नायकाचा मनोदय नाही. त्यापेक्षा सर्वच बाबतीत कठीण पर्याय तो निवडतो- इराकमध्ये बसरा युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करण्याचा.

जरी तो मनाच्या अस्वस्थतेवर मात करण्यासाठी किंवा कायमस्वरूपी आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी स्टॉप-गॅप अरेंजमेंट म्हणून ही नोकरी धरतो. तरी इराकची राजकीयदृष्ट्या अस्थिर आणि लष्कराच्या अधीन असलेली राज्यव्यवस्था त्याला चहूबाजूंनी घेरते. ह्या अस्वस्थ वर्षांची नोंद म्हणजेच ही कादंबरी. कथाविषय, घटनाक्रम आणि मुख्य म्हणजे इराकच्या पार्श्वभूमीवर उलगडत जाणारे कथा नायकाचे मनोव्यापार यामुळेच ही अतिशय लक्षवेधी कादंबरी ठरते.

जरी प्रत्यक्षात ह्या कादंबरीचा तरी नाही पण विलास सारंग यांचा उल्लेख ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ मध्ये येतोच. लेखकाने वाचलेल्या लेखकांचा प्रभाव प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याच्या लेखनावर पडतो आणि प्रणव सखदेवांच्या लेखनातून आपल्याला ते जाणवते.

तशी तर ही कमिंग-ऑफ-एज कादंबरी; समीर आणि त्याच्या भवतालाची. ही जितकी त्याची गोष्ट आहे तितकीच ती सलोनी, सानिका आणि चैतन्य या त्याच्या आयुष्यात आलेल्या त्याच्या मित्रांची देखील आहे. पण चैतन्य अचानक जाण्याने आलेली पोकळी, सलोनी आणि तिची मानसिक आंदोलने, सानिकाचं कथेतील प्रयोजन अशा विविध पातळ्यांवर ही कादंबरी फिरत राहते.

ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त करड्या होतात आणि आपल्याला जणू त्या तळ्याच्या पोटात खेचून नेऊ पाहतात. ह्यामध्ये अरुण आणि दादूकाका ह्यांच्या उपकथानकांची भरताड आहेच, ज्याचा समीरला अफू आणि दारूची दीक्षा देण्यापलीकडे फारसा उपयोग नाहीच. त्याचं घर सोडून भटकणं किंवा हिमालयात जाणं देखील वाचकाला बुचकळ्यात पाडतं.

त्यामुळेच मनावर करड्या म्लान रंगाचे ठिपके उडवण्यापलीकडे ह्या पुस्तकाचा प्रभाव पडत नाही आणि एकूणच खूप वाचूनही काहीच वाचल्याचं फिलिंग येत नाही. मराठी नवसाहित्य पुढे नेऊ पाहण्याच्या लेखकाकडून हे निराशाजनक आहे.

शेवटी इतकंच- विलास सारंग देर सही लेकीन अजूनही काही पुस्तक वाचून पहावीत, कदाचित काही नवीन कवडसे सापडतील.