दंशकाल – ह्र्षीकेश गुप्ते

DqhQCEIXQAAjdad

पुस्तकाच्या पृष्ठभागावर दिसणारी विहीर हि फक्त ह्या घराचंच नाही त्या घरामध्ये राहण्याऱ्या माणसांचं देखील प्रतिक आहे. थांग न लागणारी विहीर आणि एकमेकांना धरून तगू पाहणारी माणसे खरंतर माणसाच्या अथांग मनोव्यापाराचं रूपक म्हणून सामोरी येतात.

हि कथा घडते तर तशी कोकणात, जिथे त्यांचं वडिलोपार्जित घर आणि वावर आहे. मोठं नावाजलेलं तालेवार घराणं, पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध  आणि दबदबा  असणारं.पण एकेदिवशी भानूकाका येतो किंवा खरेतर येत  नाही,  तो दुसराच कुणी म्हणून येतो आणि इथूनच भूगावतील तालेवार देशमुखांच्या घराला हादरे बसायला सुरुवात होते. याची सुरुवात आधीच म्हणजे मुबईतून झालीये हे समजतं , जेव्हा काकू मागोमाग दाखल  होते. त्यानंतर घरातले हास-भास, एकामागोमाग घडणारे विचित्र योगायोग; खासकरून भिवलीचा वावर आणि काकूचं बदलणारं स्थान- हे सगळं फारच ओघवत्या पण ठाशीव पध्दतीने मांडलेलं आहे आणि लेखक आपल्याला ह्यात बऱ्यापैकी गुंगवून टाकतो, तिथून पुढे कर्णिक प्रकरणापर्यंततरी खास एका बैठकीत संपवावी अशी ही कादंबरी आपल्याला बांधून ठेवते.

सगळ्यांनी येनकेनप्रकारे डोंबिवलीला स्थायिक  होणं आणि त्या  पुढच्या घटना या आधीच्या कथेला वेगळ्या वळणावर नेतात. खानोलकरांची आठवण यावी इतक्या सशक्तपणे पडलेली गुढाची सावली हटून तिथे  आता  त्या घरापुढील झाडांची सावली पडू लागते. जयवन्त दळवींची आठवण करून देण्याऱ्या ह्या सावल्या मग एकमेकांत गुरफटत जातात आणि आपण मात्र त्या  गुंतवळ्यात हरवत नाही, याच कारण माझ्यामते कथेचा  फोकस आता नानूवर  केंद्रित  होतो. सुरुवातीपासून निवेदक असलेला , सगळ्यांच्या मनोव्यापाऱ्यांचा धांडोळा घेऊ पाहणारा  नानू  शेवटी आपल्या  मनाच्या  तळाशी  डोकावून पाहू  शकत  नाही. अण्णा -आई – काकू ह्या  इतिहासाची त्याच्याच  घरात पुनुरावृत्ती होणं आणि  त्याने शोधलेलं  गुलबकावलीचं रूपक, हा त्याच्या  अंतर्मनातील लालसेच्या, लोभाच्या गाभ्यापर्यंत आपल्याला घेऊन  जातो. मला  इथपर्यत आल्यावर पुन्हा  फिरून भिवली आणि भानूकाबद्दल का सांगायचं होत, त्याच प्रयोजन न समजल्याने थोडा रसभंग झाला  खरा पण तरीही ह्या गोष्टीने मला शेवटपर्यंत गुंतवून ठेवलं.

एका नवीन  लेखकाची अतिशय  धाडसी विषयाला  स्पर्श करणारी, पण तरीही कुठेही बीभत्स न होता फार प्रभावी आणि खिळवून ठेवणारी कादंबरी म्हणून दंशकाल वाचनीय  आहे. मला नक्कीच  त्यांची पुढील  पुस्तके  वाचायला आवडतील.