एखाद्या पुस्तकाबद्दल तुम्ही खूप प्रशंसा ऐकावी, त्याच्या उल्लेखनीय असण्याची नोंद घ्यावी पण काही ना काही कारणाने ते पुस्तक वाचायचं राहून जावं असं माझं ‘मित्रो मरजानी’च्या बाबतीत बऱ्याच वेळा झालं. कधी कधी तर हि अतिप्रशंसा पुस्तकाच्या दर्जाबद्दल देखील प्रश्न उपस्थित करते कारण सध्याच्या काळातील ओव्हर हाईप्ड चीजा खरोखरचं तितपत चांगल्या असतील याची काहीही शाश्वती नाही. पण कृष्णा सोबतींची हि आयकॉनिक चरित्रनायिका मात्र या अफाट प्रसिद्धीला साजेशीच आहे.
गोष्ट तशी छोटीशीच- गुरुदास आणि धनवंतीच्या खाऊन पिऊन सुखी, वाढत्या परिवाराची. गुरुदासने मुलांच्या हातात कारभार देऊन निवृत्ती स्वीकारली आहे, वयोमानानुसार प्रकृतीच्या कुरबुरींकडे कानाडोळा करत उरलेले दिवस ईशस्मरणात आणि धनवंतीच्या सहवासात घालवण्यात त्यांना जास्त सुख आहे. पण धनवंती आता सासूच्या भूमिकेत शिरल्यामुळे तिला अजूनही निवांतपणा नाही. नवऱ्याला न दिसण्याऱ्या परंतु नजरेआड करता न येण्यासारख्या कुटुंबातील बाबी तिला दिसतात आणि ती मनोमन झुरत, निराश होत जाते.
मोठा भाऊ-बनवारीलाल दुसऱ्या लग्नानंतर सांसारिक आयुष्यात बऱ्यापैकी स्थिरावला आहे. घराच्या उद्योगाची धुरा आणि उर्वरित दोन भावांचे संसार मार्गी लावण्याची जबाबदारी आता त्याच्याच खांद्यावर आहे. त्याची पत्नी- सुहाग हि आदर्श भारतीय स्त्रीचा उत्तम नमुना आहे; आपलं घरातील स्थान आणि त्याप्रती असणारी कर्तव्य याची पक्की जाणीव तिला आहे. तिच्या बरोब्बर उलट आहे सगळ्यात धाकटी सुनबाई अर्थात फुलवंती; गुलजारीची बायको बहाणे बनवण्यात पटाईत आणि सासरच्या नावाने येता जाता खडे फोडण्यात धन्यता मानणारी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे.
या दोघांच्या मधली आहे मित्रो- सरदारीलालची बायको सुमित्रा. वडिलांशिवाय एकट्या आईच्या छत्रछायेखाली वाढलेली, आईची बंडखोर वृत्ती अंगात मुरलेली आणि आपल्या सौन्दर्याचा खुबीने वापर कसा करून घ्यायचा याच लहानपणापासून बाळकडू मिळालेली मित्रो अशा पारंपरिक कुटुंबात सामावून जाणं कठीणच. ती मोठ्या जावेच अनुकरण करून घरातील कामं करण्याचा प्रयत्न करते, जास्त काही कर्तृत्व नसलेल्या नवऱ्याचा अनुनय करण्याचा आव आणते पण मित्रोचा जीव या कशातही लागत नाही. पिंजऱ्यातील मैनेप्रमाणे तिला खुलं आकाश साद घालतंय, तिला या संसारिक पाशातून पाय काढून आपल्या मनाप्रमाणे विमुक्त जगायचं आहे. बुळ्या, काहीशा कमजोर सरदारीलालच्या पलीकडेही काही मनाजोगते पर्याय उपलब्ध आहेत याची तिला पूर्णपणे जाणीव आहे. खरंतर हि जाणीव तिला तिच्या आईनेच फार पूर्वीपासून करून दिलेली आहे आणि अजूनही ती तिचं गेलेलं तरुणपण आपल्या मुलीद्वारे जगू पाहते आहे. पण मित्रो आईच्या या धगधगत्या इच्छेपायी आपलं आयुष्य उधळून देणार का?
हे सगळं खुलासेवार आणि लेखिकेच्या खास शैलीमध्येच वाचण्यात जास्त खुमारी आहे. त्यामुळेच हि छोटीशी कादंबरी आणि तिची मनोनिग्रही कथानायिका आपल्या मनामध्ये कायमचं घर करते.