गिरीश कुबेर लिखित एका तेलियाने

गिरीश कुबेर लिखित एका तेलियाने

खनिज तेल आणि त्याचा जगाच्या राजकारणावर तसेच अर्थकारणावर होणारा परिणाम या विषयाला वाहिलेलं हे लेखकाचं दुसरं पुस्तक. यामध्ये मुख्य फोकस आहे तो तेलाच्या जगड्व्याळ व्यापाऱ्यात गुंतलेल्या लोकांवर आणि प्रामुख्याने उल्लेख केलेल्या शेख झाकीर यामानी यांच्यावर.

पुस्तकाचा केंद्रबिंदू म्हणता येईल अशा यामानी यांच्या कथेकडे वळण्याआधी लेखक आपल्याला खनिज तेलाच्या शोधामध्ये आणि व्यापारामध्ये गुंतलेल्या देशांची, लोकांची संक्षिप्त पण तरीही रोचक ओळख करून देतात. सुव्यस्थित मार्गक्रमणा करण्याऱ्या इराण किंवा व्हेनेझुएला सारख्या देशांची तेलाच्या हव्यासामुळे झालेली फरफट आणि त्यांच्या सत्ताकारणांमध्ये, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या दूरगामी परिणामांची कल्पना आपल्याला सुरुवातीच्या प्रकरणांमधून येते.

पुढील प्रकरणांमध्ये आपल्याला शेख झाकीर यामानी यांची साद्यन्त ओळख होते; त्यांच्या सौदी अरेबिया मधील बालपणापासून ते त्यांच्या अमेरिकेतील क्षैक्षणिक वास्तव्यापर्यंत. त्यांच्या धर्मपंडित वडिलांचा तसेच भावंडांचा परिचय होतो. लेखकाने शेख झाकीर यामानी यांच्या बरोबरीने सौदी अरेबियाचा देखील समांतर इतिहास अगदी बारकाईने मांडला आहे. या एकेकाळच्या ओसाड, टोळ्यांच्या प्रदेशामध्ये होणारे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बदल लेखकाने अगदी व्यवस्थित टिपले आहेत.

सौदी सरकार, अधिकारी, तेल कंपन्या आणि या सगळ्यांचा कारभार हाकणारं राजघराणं यांचं यथोचित, मोठ्या तपशिलात वर्णन केलेलं आहे. पश्चिम आशियातील इतर देश आणि त्यांचं अंतर्गत राजकारण यांच देखील ठाशीव अस्तित्व आहे. त्यामधून तेलाचं राजकारण, अरब देशांमधले परस्पर संबध, इस्त्रायलची भूमिका आणि त्याची सदोदित पाठराखण करणारी अमेरिका (USA), यातून उद्धभवलेली खरीखुरी युद्धे आणि कायमची स्फोटक परिस्थिती, या सगळ्यामध्ये कळीची भूमिका बजावण्याऱ्या तेल कंपन्या याचा सांगोपांग आढावा लेखकाने घेतला आहे.

शेख झाकी यामानी यांना मध्यवर्ती ठेऊन मांडलेला हा जवळपास पाच दशकांचा तेलाचा इतिहास रोमहर्षक आणि एकूणच जागतिक व्यापार समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. चांगल्या साहित्याच्या शोधात असण्याऱ्यांनी आणि विशेषतः ज्यांना जागतिक अर्थकारण समजून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी ह्या पुस्तकाची मी नक्कीच शिफारस करीन.