या वास्तवदर्शी ग्रामीण पार्शवभूमी असलेल्या कादंबरीचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर मी म्हणेन ‘व्यथा’, हाच शब्द त्यासाठी जास्त समर्पक होईल. एका शेतकरी कुटुंबाची कहाणी सांगणारी कथा आपल्याला यापूर्वीही अनेक कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटांमधून दिसल्यामुळे तशी बऱ्यापैकी परिचित आहे. पण या कादंबरीचं वेगळेपणा लेखकाने केलेल्या या चिरपरिचित कथेच्या मांडणीतून दिसतो. उपरोलिखित बहुतेक कथा, कादंबऱ्या आणि चित्रपट जिथे शेती आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या कथेचा समूहाच्या पातळीवर विचार करतात, तिथे हि कहाणी एका कुटुंबाला मध्यभागी ठेवून त्याच्या आसपास असलेल्या समाजाबद्दल भाष्य करते.

रूढ अर्थाने या कादंबरीची नायिका आहे कृषिप्रधान ग्रामीण परिस्थिती परंतु ढोबळमानाने कथा प्रस्तुत होते एकनाथाच्या दृष्टिकोनातून. एकनाथ तनगरे, त्याचे आई वडील, बायको अलका आणि धाकटा भाऊ हे पारंपरिक शेतकरी कुटुंब त्यांची कोरडवाहू शेती सांभाळत कशीतरी गुजराण करत आहेत. आई वडिलांनी घाम गाळून, काबाडकष्ट करून राखलेलया शेतीचा भार आता एकट्या एकनाथच्या खांद्यावर आहे कारण पोस्टग्रॅड्युएशन करूनही लाच देण्याची ऐपत नसल्यामुळे त्याला प्राध्यापक किंवा शिक्षकाची नोकरी मिळूच शकली नाही. ज्या उज्ज्वल भविष्याच्या आधारावर त्याने मोहोळसारख्या सुधारित निमशहरी गावातील अलकाबरोबर लग्न केलं तीदेखील या नाईलाजाने सामोरं आलेल्या परिस्थितीवर नाराज आहे. तिची नाराजी ती वेळोवेळी नवऱ्याचा शारीरिक जवळिकीचा प्रस्ताव धुडकावून आणि सासू समोर आकांडतांडव करून व्यक्त करते.
कुटुंबाचं शेंडेफळ असलेला एकनाथचा धाकटा भाऊ देखील शिकून नोकरी न मिळाल्यामुळे वैतागलेला आहे. पण घरची शेती कारण्यापेक्षा उनाडटप्पू उद्योग करण्यामध्ये आणि झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग शोधण्यामध्ये मधूला जास्त उत्साह आहे. त्यासाठी त्याने त्याच्याचसारख्या सुशिक्षित बेकार तरुणांची एका सोनेरी टोळी बनवली आहे ज्यांचं मुख्य काम हे असले भलते पैसे कमवण्याचे मार्ग शोधणे हेच आहे. मधूच्या अशाच आततायी वागणुकीमुळे त्याच्या कुटुंबाला आपली सुपीक जमीन गमवावी लागते आणि तिथूनच त्यांच्या अधोगतीला सुरुवात होते.
तोपर्यंत कशीतरी तग धरून ठेवलेली इभ्रत पार धुळीला मिळून तनगरे कुटुंबाची खऱ्या अर्थाने वाताहत होते परंतु हि परिस्थिती ओढवून घ्यायला जबाबदार नसणारा एकनाथ शेवटी ती निभावून न्यायला अपयशी ठरतो आणि कहाणी एका शोकांतिकेवर येऊन थांबते. बघायला गेलं तर त्यांच्या आजूबाजूचे सारेच जण या शोकांतिकेचा एक भाग आहेत.
कृषी आणि त्यावर आधारित व्यवसायांची दुरावस्था, सरकारी फायदे आणि नवीन सुविधा तळागाळातील शेतकराऱ्यापर्यंत पोचवण्यात आलेलं समाजाचं अपयश, सामाजिक उतरंड आणि आर्थिक विषमता, सर्व थरांवर पसरलेला भ्रष्टाचार आणि खाबुगीरी, शिक्षण आणि त्यावर आधारित नोकऱ्या यांचं विषम प्रमाण असे सगळेच विषय लेखकाने उत्तमरित्या हाताळले आहेत. म्हणायला जरी एकनाथचं कुटुंबीय या कथेचा केंद्रबिंदू असला तरीही हि सक्षम कादंबिरी त्याच्या आसपास घडणाऱ्या संबंधित घटनांना आणि प्राप्त परिस्थितीला आपल्या कथावस्तूच्या परिघात घेते. त्याअर्थाने हि सार्वकालिक कादंबरी आजही तितकीच वाचनीय आहे. समकालीन उत्तम पुस्तकांच्या वाचकांनी न चुकवावं असंच हे पुस्तक आहे.