महाश्वेता देवी या त्यांच्या लेखनाच्या अनोख्या शैलीमुळे आणि मुख्यतः ग्रामीण पार्श्वभूमी असण्याऱ्या कथावस्तूंमुळे चिरपरिचित आहेत. त्यांच्या कथा ह्या बहुत करून पूर्वोत्तर राज्यांमध्ये घडतात आणि उपेक्षित, शोषित लोकांच्या व्यथांची गडद छाया त्यांवर पडलेली दिसून येते. उपरोल्लिखित कादंबरी जरी कलकत्ता आणि आसपास घडत असली तरीही कथेच्या पूर्वपीठिकेमध्ये डोकावण्याऱ्या गावांची, वनांची त्यावर दाट सावली आहे.
हि कथा घडते कलकत्त्यामधील हरिकेश चौधरी यांच्या घर- परिवारामध्ये. त्यांच्या घरी राहणारी त्यांची एकुलती एक मुलगी सुनीती- जिला लोकं बिबी’दि किंवा बिबीदीदी म्हणून संबोधतात, तिची मुलगी आणि हरिकेशची एकुलती एक नात म्हणजे वनवाणी- जिला सर्वजण वाणी म्हणूनच ओळखतात, हि या कथेची मुख्य पात्रं. ज्या काही घटना घडता आहेत त्या वर्तमानकाळातील दोन दिवसांपुरता सीमित आहेत, पण त्या घटनांची पाळंमुळं कित्येक दशकं, कितीतरी वर्षे मागं जातात. निमित्त आहे ते हरिकेश उर्फ बापी यांच्या ऐशींव्या वाढदिवसाचं, त्यांच्यासारख्या नामाकिंत वकील आणि ‘देशप्रेमी’ समाज सेवकाचा हा खास दिवस तितक्याच जंगी इतमामात साजरा व्हावा हि त्यांची बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा आहे. हि अपेक्षा त्यांनी त्यांना परमेश्वर स्वरूप मानण्याऱ्या हाबुलकडे तसेच स्वतःच्या लेकीकडे वेळोवेळी व्यक्त केली आहे. पण असा कुठलाही समारंभ किंवा कार्यक्रम होऊ नये या तिच्या मतावर बिबीदीदी मात्र ठाम आहे.
बिबीदीदीच्या या निर्णयामागे काय कारणं आहेत, आयुष्यभर उभा दावा मांडणाऱ्या बापाविरुद्ध आवाज उठवावा असं तिला आत्ताच का वाटतंय? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हळूहळू, कथा जशी उलगडत जाते तशी मिळत जातात. जुन्या दुःखाच्या जखमा ज्या इतक्या वर्षांनंतरही खपली काढायचा अवकाश कि भळभळ वाहू लागत आहेत, त्या जखमा तिच्या बापीने दिल्यामुळे त्यांच्याकडूनच मिळण्याऱ्या स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत सुनीती/ रमला/ बापीदीदी कितीवेळ अशीच तडफडत जगणार? यामध्ये तिला खंबीर साथ आहे ती हाबुल आणि त्याची आई सरमाची. हाबुल ह्या गुंत्यामधून मार्ग कसा काढतो आणि जे सुख तिला आयुष्यभर मिळालं नाही ते बिबीदीदी आपल्या मुलीला तरी मिळू देईल का, या प्रश्नांची उत्तरं कथानकाच्या अखेरीला येतात.
चालू वर्तमानकाळ आणि सतत त्यावर असणारी भूतकाळाची दाट सावली हे या कथानकाचं वैशिष्ट्य, त्यामुळे असेल कदाचित पण सुरुवातीची काही पानं तरी हि गोष्ट वाचकाला गोंधळवून टाकते. जोपर्यंत हाबुल बापी समोर बसून सगळ्या घटना संगतवार मांडत नाही तोपर्यंत तरी हा घटनांच्या सुसंगीताचा गोंधळ कायम राहतो. कदाचित त्यामुळेच असेल पण कथा शेवटच्या वीस-पंचवीस पानांमध्ये वेग पकडते आणि आपल्याला खिळवून ठेवते.
फारच कमी पात्ररचनेमध्ये, घटनांमधून नाट्यमयता उभी करण्यात लेखिका अत्यंत निपूण आहेत आणि त्याचा परिचय ह्या लहानशा कादंबरीमधून देखील होतो. भारतीय साहित्यतील अतिशय सुपरिचित आणि आदरणीय लेखिकेचं हे अजून एक वाचायला हवं असं पुस्तकं, याची मी नक्कीच शिफारस करेन.