नारायण धारप लिखित संक्रमण

भयकथा आणि विशेषतः नारायण धारपांच्या भयकथांचा एक साचा ठरून गेलेला आहे. एखादी विशिष्ट जागा किंवा व्यक्ती आणि त्याभोवती असलेला अमानवी शक्तींचा वावर हे बहुतेक कथानकांमधील मुख्य सूत्र. संक्रमण हि कादंबरीदेखील याच कथासूत्रावर’बेतलेली आहे आणि त्या अर्थाने ती या विशिष्ट वाचनप्रकारच्या वाचकांच्या अपेक्षा पुरेपूर पूर्ण करते परंतु त्याहीपलीकडे जाऊन ती इतरही अतेंद्रिय शक्तींचा धांडोळा घेऊ पाहते. त्या अर्थाने ती भयकथा असूनही वेगळी ठरते.

सवर्साधारण, मध्यमवर्गीय श्रीकांतला एका दिवशी अचानक एक सॉलिसिटर पत्र पाठवून तातडीने बोलावून घेतात आणि तो होनप कुटुंबीयांच्या संपत्तीचा एकुलता एक वारस असल्याचं सांगतात. आधी अविश्वास, मग विश्वास आणि मग संशय अशा मार्गाने श्रीकांत त्या सगळ्या मालमत्तेचा ताबा घेतो खरा पण ज्यांच्याकडून हि संपत्ती त्याला अचानक मिळाली त्यांच्या अचानक गूढरित्या, अकस्मात गायब होण्याच्या कारणांचा तो शोध घेऊ लागतो. त्यातून त्याला कळतो होनप कुटुंबाचा पूर्वेतिहास आणि त्या अर्थामागचा अनर्थ.

याच मागावर असताना त्याची भेट होते महाराजांशी आणि त्याच्या आयुष्याला एक अनपेक्षित कलाटणी मिळते. इथून पुढे त्या बंगल्यातील अरिष्ट सांवल्यांचं रहस्य, त्यांचा श्रीकांतने केलेला मुकाबला आणि त्यामध्ये महाराजांनी केलेली पाठराखण असा वेगवान, मनोरंजक भाग मूळ पुस्तकामध्येच वाचायला मजा आहे. नंतर मात्र कादंबरी काहीशी रेंगाळते आणि भयकथेची वाट सोडून भक्तिमार्गाकडे वळते. कदाचित काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तर मिळतील म्हणून आपण वाट बघतो पण विशेष हाती काही लागत नाही.

हा शेवटचा भाग आणि उपसंहार वगळता हि कादंबरी वाचकांच्या धारपांच्या लिखाणाबद्दल असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरली आहे.