सानिया यांच्या कथेतील स्त्रिया ह्या बहुतेक एका विशिष्ट सामाजिक-आर्थिक वर्गातून आलेल्या दिसतात. स्वतंत्र विचारसरणी, व्यवस्थित किंवा उच्च शैक्षणिक पार्शवभूमी आणि स्वतःचे निर्णय घेण्याची मानसिक कुवत असण्याऱ्या स्त्रिया त्यांच्या कथेमध्ये मध्यवर्ती असतात. बहुधा शहरी किंवा निमशहरी भागातील या स्त्रिया एका ठराविक विचारसरणीनुसार त्यांचं आयुष्य व्यतित करणं उचित समजतात. ओमियागे या दीर्घ कथासंग्रहामधील अनिता, सुजाता, सरिता, श्यामल या सर्वजणी या सगळ्या वर्णनांमध्ये चपखल बसतात.
ओमियागे या तीन भागांमध्ये विस्तारित कथेचा आरंभ होतो तोच मुळी क्योतोसारख्या सर्वस्वी आगळ्यावेगळ्या शहरात, आपल्या कॉलेजच्या दूरदेशीस्थित मित्राला- जेसनला भेटायला म्हणून अनिता येते आणि नवीन ठिकाण पाहण्याच्या निमीत्ताने ते दोघेही त्यांच्या स्वत्रंत तसेच सामायिक भूतकाळाचा शोध घेऊ लागतात. पहिल्या भेटीमधील अनोळखी क्योतो जसं हळूहळू उलगडायला लागतं तसं अनिताला देखील मागे सोडलेल्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ लागतो. रजतच्या आगमनाने आणि त्याच्या एका कातर क्षणी दिलेल्या कबुलीने एक कैक वर्षांची निरगाठ सोडायला मदत होते. तिथून पुढे अनिताच्या प्रवासाची जणू दिशा ठरून जाते, तो रस्ता पुन्हा क्योतोपर्यंत आणि पुण्यापर्यंत देखील पोहोचतो पण आता काय करायचं याबद्दल तिचा निर्णय जणू ठरून गेला आहे.
उर्वरित कथामंध्ये देखील आपल्याला अशाच आयुष्याचा थांग न लागलेल्या किंबहुना एका ठरविक मुक्कामावर पोहोचण्याबद्दल साशंक असलेल्या कथानायिका भेटतात, मग ती मैत्रीच्या वाटेवर एकाच वळणावर थांबलेली श्यामल असू देत किंवा आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना स्वतःच्या कुटुंबाला नक्की कुठल्या टप्प्यावर गमावलं याचा उलटसुलट विचार करणारी सरिता असू देत. शेवटच्या निरोप या कथेतील सुजाता देखील जरी मन घट्ट करून एकाच दिशेने चालत निघाली आहे तरीही तिने मागेच निरोप दिलेलं, समरसून जगलेलं एक आयुष्य आहे आणि ती एक प्रकारे पुन्हा एकदा निरोप घेण्यासाठी तिथेच पुनश्च फिरून आली आहे.
देशपरदेश फिरलेली माणसं या कथासंग्रहामध्ये जागोजागी भेटतात. पण ह्या प्रवासाबरोबरच त्यांचा एक स्वंत्रत स्वतः बरोबर प्रवास चालूच आहे आणि लेखिका ज्याप्रकारे ह्या दुसऱ्या प्रवासात आपल्याला सहप्रवासी बनवते ते फारच विशेष आहे. त्यांची वाक्यरचना, विचार व्यक्त करण्याची पद्धत जरीही अधेमधे एकसाची वाटली तरीही त्यामागच्या भावना अस्सल असल्यामुळेच ह्या कथा कुठेही एकसूरी होत नाहीत. कुठलाच माणूस शंभर टक्के परिपूर्ण असू शकत नाही, प्रत्येकाची स्वभाववैशिष्ठय, त्यांच्या आयुष्याबद्धलच्या धारणा त्यांना थोड्याबहुत करड्या रंगामध्ये वर्ग करतात. हेच सानिया यांच्या कथेमध्ये प्रामुख्याने दिसतं आणि दूरदेशीच्या या कथानायिका आपल्या जवळच्या होऊन जातात.
मराठी लघुकथेमध्ये वेगळे प्रयोग करणाऱ्या, खासकरून कथेचे अनोखे आयाम मांडण्याऱ्या स्त्रीलेखिका म्हणून सानिया यांचे मराठी साहित्यविश्वात विशेष स्थान आहे. हा कथासंग्रह त्या कीर्तीला जागणारा आहे आणि म्हणूनच एकदातरी वाचावा अशी मी शिफारस करेन.