सत्य व्यास लिखित बनारस टॉकीज

बनारस शहराची पार्श्वभूमी असलेली आणि मुख्यत्वे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये घडणारी हि कहाणी आपल्याला शेवटपर्यँत गुंतवून ठेवते. हि कथा आहे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या कायद्याच्या पदवीधर मुलांची आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत तीन जिवलग मित्र- अनुराग डे ‘दादा’, जयवर्धन आणि सूरज. यापैकी सूरज या कहाणीचा सूत्रधार आणि नायक; त्याच्या हॉस्टेलमधील आगमनापासून सुरू झालेली हि कादंबरी अखेरीस त्याच्या फायनल इयर परीक्षेच्या दिवशी संपते.

कादंबरीची कथा वरकरणी पाहता सरळसोट आहे; तीन मित्र आणि त्यांच्या कॉलेज जीवनावर आधारित जास्त काही फाफटपसारा नसलेली अशी छोटेखानी कादंबरी. सूरज BHU आणि पर्यायाने हॉस्टेल जीवनात पाऊल ठेवतो आणि त्याची ओळख अनुराग डे उर्फ दादा बरोबर होते. लगोलग जयवर्धन त्यांना येऊन मिळतो आणि हे त्रिकूट सहा सहामाहीमध्ये जी मजा मस्ती, अभ्यास करतात त्याची कथा म्हणजे हि कादंबरी. कॉलेज जीवन म्हटल्यावर अर्थातच त्यात प्रेमप्रकरण आहे; कथेच्या एका अनपेक्षित वळणावर सूरजला शिखा भेटते आणि कथेमध्ये प्रेमाचे रंग भरायला सुरुवात होते. जवळपास पूर्ण कहाणी अशी हसतखेळत, रमतगमत चाललेली असताना एक अकस्मात धक्का बसतो आणि सूरजसह वाचक देखील अचंबित होतात. हि सगळी गुंतागुंत आणि उलगडा वाचण्याचा आनंद काही और आहे.

पण याहीपेक्षा जास्त मजा कथेला आणि पात्रांना पार्श्वभूमी पुरवण्याऱ्या बनारस शहराबद्दल वाचण्यात आहे. ज्याप्रकारे लेखकाने या प्राचीन नगरीचं वर्णन केलं आहे त्यावरून त्यालादेखील हे शहर किती आवडत ते छानपैकी अधोरेखित होतं. असंच सुरम्य वर्णन युनिव्हर्सिटी, आजूबाजूचा परिसर आणि बनारसच्या सुप्रसिद्ध खादयपदार्थांविषयी देखील येतं. कॉलेजकुमारांच्या साथीने हे सगळं कथेद्वारे अनुभवणं हा एक सुरेख अनुभव आहे,

चांगल्या कथेच्या शोधात असलेल्यांनी न चुकवावं असं हे एक मस्त पुस्तक आहे.